काहीस माझ्याबद्दल
नमस्कार मित्रांनो,
मी इम्रान. काही मित्रांना ओळखीतला पण काहींना अनोळखी. आपल्याच गावचा एक नागरिक ! गेले २५ वर्ष या गावात राहतोय अगदी जन्मापासून, गेले ५ वर्ष माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत आहे, वाटल या माझ्या अनुभवाचा उपयोग काहीसा गावासाठी का नाही? सध्या जग खूप जवळ आलेलं आहे यात शंकाच नाही, इंटरनेट हे सध्या एक उगवत माध्यम बनलेलं आहे, माहितीचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आज इंटरनेट या माध्यमाचा उल्लेख केला जातोय. या बदलत्या परिस्थिती बरोबर गावच्या लोकांनीही या माध्यमाचा उपयोग करावा हीच प्रामाणिक इच्छा ठेवून मी हा ब्लॉग गणेश चरणी अर्पण करतोय.
काहीस ब्लॉगबद्दल
मला आठवतात काही दिवस जेव्हा आम्ही मंडळातील सगळे मित्र गणेशचतुर्थीचा सण आनंदाने भक्तिभावाने साजरा करायचो, अगदी गणेशजींच्या आगमनापासून ते अगदी विसर्जनाच्या मिरवणूकीच्या तयारीपर्यंत इतका उत्साह आमच्यात यायचा ते त्या सिद्धीविनायकामुळेच ! वाटल मग ! माझा तो अनुभव तो उत्साह या ब्लॉगद्वारे आपल्या सर्वांशी शेअर करावा.
गणेश प्रतिस्थापनेच्यावेळी प्रत्येक भक्ताकडून घेतली जाणारी काळजी , रोजच्या आरतीच ठरलेलं वेळापत्रक,आठवत मला भक्तिभावाने केलेली आरती, आरती नंतरच्या प्रसादावर आम्ही अगदी तुटून पडायचो अगदी लहान मुलांसारखे, जे आरतीला नसायचे त्यांना अध्यक्षाकडून मिळणारा काव, विसर्जनाच्या आदल्या दिवशी असणाऱ्या नाटकासाठी गावोगावी रात्री होणारी भटकंती त्यामुळे घरच्यांशी होणारा प्रेमळ वाद, त्यानंतर त्या नाटकाच्या रीयल्सर्स, स्त्रीच पात्र करण्यासाठी होणारी प्रेमळ वादावादी आणि प्रत्यक्ष नाटका वेळी उडणारी तारांबळ,नाटका वेळी आपल्या नाटकाला मिळणारा प्रतिसाद पाहून होणारा आनंद, आणि तो दुसरा दिवस म्हणजे विघ्नहर्त्याच्या निरोपाचा अर्थात मिरवणुकीचा म्हणजे दंगा, मस्ती, उस्ताह, प्रेम आणि अखेरचा तो क्षण जेव्हा डोळ्यातील अश्रूंबरोबर नाईलाजाने त्या आपल्या लाडक्या विनायकाला द्यावा लागणारा निरोप तोही "पुढच्या वर्षी लवकर परत या" या हट्टाबरोबर, या सर्व क्षणांची आठवण झाल्यानंतर वाटत गणेशजी रोज यावे आमुच्या दारी !!!
या वर्षीचा गणराया आपल्याला शुभ ठरो हि आशा, मित्रानो हा सण भक्तीचा आहे - आणि माझ्या मते आपणही तो भक्तिभावाने-प्रेमाने साजरा करावा हीच एक प्रामाणिक इच्छा !!!!!!
शतश: ऋणी
अभिजीत पाटील,अमर पाटील,उमेश दिंडे, दौलत व्हरगे,संजय जावळे या काही मित्रांच्या सहकार्यामुळे मला या ब्लॉग साठी प्रेरणा मिळाली.
मी त्यांचा शतश ऋणी आहे.
शिवाय सर्व मंडळांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे.